Ad will apear here
Next
असेन मी, नसेन मी
रसिकांच्या मनात घर करून राहणाऱ्या कितीतरी कविता, गाणी शांताबाईंनी लिहिली. आज सहा जून. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’च्या आजच्या भागात ‘असेन मी, नसेन मी’ या गीताबद्दल...
.......
१९९६ सालची गोष्ट...मी याचि देही याचि डोळा अनुभवलेला एक अपूर्व सोहळा... सोहळा म्हटलं की तो ‘दिमाखदार’ असं विशेषण आपण लावतो; पण खरंच सांगते तो सोहळा ‘दिमाखदार’च्या ही पलीकडचा होता. तो ‘अपूर्व’च होता. कारण संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा तो सोहळा होता. आळंदी तीर्थक्षेत्री साहित्यिकांची मांदियाळी तर होतीच, त्याबरोबर साक्षात साहित्यशारदा शांता शेळके संमेलनाच्या अध्यक्षा होत्या, तर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर उद्घाटक होत्या. 

आळंदीला जाण्याची ओढ लागली होती. माझी मुलं तेव्हा लहान होती. मुलगा अवघ्या सहा वर्षांचा आणि मुलगी तेरा वर्षांची. गर्दीचा महापूर लोटला होता, तरीही मुलांना घेऊन मी संमेलनस्थळी पोहोचलेच. वारकऱ्यांना जशी विठूमाऊलीच्या, ज्ञानेश्वरमाऊलीच्या भेटीची आस असते, तशीच माझ्याही मनी आस होती. ज्ञानेश्वरमाऊली, शांताबाई शेळके आणि लता मंगेशकर या त्रिवेणी संगमाला डोळे भरून पाहण्याची आणि मन भरून ऐकण्याची. आषाढी एकादशीला पंढरपुरातील चंद्रभागेचं वाळवंट जसं वारकऱ्यांनी फुलून येतं, तसाच अनुभव आळंदीला आला. आळंदी तेव्हा साहित्यपंढरी झाली होती आणि साहित्यरसिक वारकरी... शांताबाईंना ऐकण्यासाठी जीव आतुर झाला होता. गर्दीच्या महापुरात मुलांना कशाला न्यायचं, असं मला वाटलं नाही. कारण ते साहित्य संमेलन हा असा एक साहित्यसंस्कार होता, की मुलं तो आयुष्यभर विसरू शकणार नव्हते.

ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका शांता शेळके यांच्या स्मृतिदिनी, आज आवर्जून त्या साहित्य संमेलनाची आठवण झाली. मृग नक्षत्रावर आकाशात मेघांनी दाटी करावी, तसंच शांताबाईंच्या स्मृतींनी मनाचं आभाळ आज भरून आलंय. एकामागून एक येणाऱ्या पावसाच्या सरींसारख्या अनेक कवितांच्या बरसातीत ते  चिंब होतंय...

क्षितिजास सप्तरंगी, लावण्यभास झाले
आभाळ आज कैसे, माझ्या घरास आले...

शांताबाईंच्या सप्तरंगी कवितेतल्या या ओळी. याच कवितेतल्या शेवटच्या ओळीही आठवताहेत....

हरवून भान मी ही, हा सोहळा पहाते
शब्दांपलीकडे ते, आता स्वरास आले।

खरंच शब्दांपलीकडले स्वर की स्वरांपलीकडले शब्द? सर्वत्र लावण्यखुणा ल्यालेल्या शांताबाईंच्या अनेक गीतांपैकी आज आठवतंय अरुण दाते यांच्या स्वरातलं, भावसंगीताचे शिरोमणी यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं गीत...

असेन मी नसेन मी, तरी असेल गीत हे....
फुलाफुलात येथल्या, उद्या हसेल गीत हे....

आपली कविता, आपलं गीत प्रत्येक कवीला, गीतकाराला एक ओळख मिळवून देतं, तसंच गायकाला आणि संगीतकारालाही! स्वरांनी मोहरलेल्या अनेक कवितांपैकी शांताबाईंची ही कविता ऐकली, की वाटतं आत्ता या क्षणी शांताबाईंची भेट व्हावी... त्यांच्या कुशीत शिरावं... आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट करून द्यावी... आपण काहीच बोलायचं नाही... अश्रूच सांगतील सगळं काही... काय सांगतील अश्रू? आळंदीत झालेली भेट की काळजात जपून ठेवलेल्या कविता, भावगीतं आणि झोपेच्या गावातल्या आठवणी. अश्रूंचा पडदा थोडा वेळ बाजूला सारला, तर डोळ्यांपुढे दिसतील शांताबाई...छान पदर घेतलेल्या, चष्म्याआडून हसणाऱ्या डोळ्यांच्या, आपल्या कविता, गाणी, गद्यलेखन आणि छंदाविषयी भरभरुन बोलणाऱ्या.....उत्तम अनुवाद हासुद्धा सृजनाचा आनंद मिळवून देणारा असतो. म्हणून संस्कृत श्लोकांचा, इंग्रजी, चिनी भाषेतील काव्यांचा, जपानी हायकूंचा, डोगरी-आसामी लोकगीतांचा अनुवाद करण्याचा छंद जोपासणाऱ्या शांताबाईंना ऐकणं म्हणजे श्रवणसुखाची पर्वणी! खरं म्हणजे शांताबाईंचं भाषण असो, त्यांची कविता असो, की त्यांचं भावगीत असो, त्यांच्या साहित्यकृतीतून त्या भरभरून व्यक्त झालेल्या आहेत. 

मनातलं नुसतं कागदावर उतरवून चालत नाही, तर समर्पक शब्दांचीही साथ लागते. शांताबाईंवर तर साक्षात देवी सरस्वतीचा वरदहस्त होता. ‘तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षू दे आमुच्या शिरी। जय शारदे वागीश्वरी’ असं त्यांनी म्हटलं आणि खरोखरी श्री शारदा त्यांच्या लेखणीतून अवतरत राहिली... वागेश्वरी वाणीतून बोलत राहिली... रसिकांची मनं शब्दस्वरांच्या हिंदोळ्यांवर झुलत राहिली...

मनरंगाचे आभाळ निळे
सूर धरतीशी माझा जुळे
मी पाखरांच्या बोलीत गाते
माझे फुलांशी जडले नाते।

शांताबाई असं सांगतात तेव्हा वाटतं, शांताबाई, फुलांशीच काय, अजाण-कोवळ्या मुलांशीही तुमचं नातं बालकवितेमधून तुम्ही जोडलं. तुमच्या अनेक कवितांना स्वरांनी छेडलं... आनंदघन अर्थात लतादीदी, हृदयनाथ मंगेशकर, पं. जितेंद्र अभिषेकी, श्रीनिवास खळे अशा कितीतरी दिग्गज संगीतकारांबरोबरच यशवंत देव यांच्यासारख्या ज्येष्ठ संगीतकाराला तुमच्या कवितेला स्वरसाज बहाल करण्याचा सन्मान मिळाला. किती साधं, सोपं, सहज सुचलेलं गीत, त्या गीताबद्दल शांताबाई जणू सांगताहेत...

स्वये मनात जागते, न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वत:, अबोध सर्व सांगते
उन्हे जळात हालती, तिथे असेल गीत हे
असेन मी नसेन मी, तरी असेल गीत हे।

किती सुंदर आहे हे गीत! शांताबाईंच्या मनीचं हितगूज करणारं, रसिकांच्या मनात घर करून राहणारं, अशा कितीतरी कविता, गाणी शांताबाईंनी लिहिली. नुसता उल्लेख जरी केला, तरी वही भरून जाईल; पण आत्ता या क्षणी शांताबाईंच्या आठवणी जागवताना काही गाणी साद घालताहेत... ही साद ‘जिवलगा’ची आहे, ‘शारद सुंदर’ रातीची आहे, ‘किलबिलणाऱ्या’ पक्ष्यांची आहे, हिरवा-बरवा ऋतू श्रावणाची आहे, चैत्राची आहे, झाडा-वेलींना नवचैतन्याची पोपटी पालवी बहाल करणाऱ्या ऋतू वसंताची आहे, ‘गगना गंध’ आला हे सांगणारी आहे, ‘पैठणी’तून आजीसाठी व्याकूळ करणारी आहे. परमेश्वर प्रसन्न झाला तर काय मागशील, असं मला कुणी विचारलं तेव्हा मी म्हणेन ‘देवा, शांताबाईंना परत आणा, त्यांच्या तोंडून ‘पैठणी’ ही कविता ऐकायचीय’... आजीच्या पैठणीतून आजीच्या आठवणी जागवताना शांताबाईंनी तत्कालीन मराठमोळ्या स्त्रीच्या आयुष्याची अवघी कहाणी सांगितलीय... खरंच सांगते रसिकहो, शांताबाईंची ‘पैठणी’ ही कविता माझ्यासाठीही आजीच्या पैठणीसारखी आहे. मीही शांताबाईंच्या कवितांचं पुस्तक छातीशी कवटाळून धरते आणि पुन्हा पुन्हा वाचते त्या ओळी...

कधी तरी ही पैठणी मी धरते उरी कवटाळून
मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून
मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यांनो, आजीला माझं कुशल सांगा।

शांताबाई आज आपल्यात नाहीत... आज त्यांच्या पावन स्मृतीला वंदन करताना कानात आवाज येतोय स्वच्छ, स्पष्ट, तरीही मवाळ अशा बोलण्याचा... हो, शांताबाईंचाच... रसिकांशी रेशीमबंध जोडणारा, कधीही न तुटणारा. शांताबाईंच्या कविता ज्या आतून, अगदी आतून उमललेल्या... सहजतेनं कळ्या उमलाव्यात तशा... आणि गाणी! स्वरांनी हळुवार फुंकर घालावी आणि सुमधुर गीत जन्माला यावं तशी... 

सहा जून २००२ या दिवशी शांताबाईंनी जगाचा निरोप घेतला. तेव्हा त्यांच्या मनात भैरवीत स्वरबद्ध झालेलं गीत हेच असेल का? 

कुणास काय ठाऊक कसे, कुठे उद्या असू?
निळ्या नभात रेखिली, नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले, तुला कळेल गीत हे
असेन मी नसेन मी, तरी असेल गीत हे... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

(१४ वर्षांच्या मुलीने काढलेले कवयित्री शांता शेळके यांचे पेन्सिल स्केच पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदरातील लेखांचे पुस्तक आणि ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे.)




 
(लेख पूर्वप्रसिद्धी : ६ जून २०१७)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZCQCN
Similar Posts
आधी वंदू तुज मोरया... गणपतीबाप्पा वाजत गाजत आले. भक्तिरसानं ओतप्रोत भरलेल्या गणेशगीतांचे स्वर चहूबाजूंनी ऐकू येऊ लागले. किती नवी-जुनी गाणी! पण एक गाणं मात्र एखाद्या घरात, एखाद्या गणेशमंडळाच्या मंडपात एवढंच नाही, तर तुमच्या आमच्या मनात सदैव वाजत असतं ते म्हणजे ‘आधी वंदू तुज मोरया...’ ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज त्याच गाण्याबद्दल
ही वाट दूर जाते... कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिन नुकताच (१२ ऑक्टोबर) होऊन गेला. तसेच ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिन २६ ऑक्टोबर रोजी आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या शांताबाईंनी लिहिलेली आणि हृदयनाथ यांनी संगीतबद्ध केलेली ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा.
आखाजीचा मोलाचा सन देखा जी.... आखाजी म्हणजेच अक्षय्यतृतीया! उन्हाचा कहर वाढत असतो, जिवाची लाही लाही होत असताना आखाजीच्या सणाची तयारी स्त्रिया मोठ्या उत्साहानं करतात. आखाजीचा सण खानदेशात विशेष रूपानं साजरा होतो. बहिणाबाई आपलं रोजचं जगणं आपल्या गाण्यांमधून गात असत. यशवंत देवांसारख्या श्रेष्ठतम संगीतकाराने आपल्या प्रतिभावान संगीतकलेचा
चाफा बोलेना... संगीतकाराला काव्याची उत्तम जाण असेल, तर त्याने दिलेल्या चालीवर कविता कशी मोहरते आणि रसिकांच्या मनात सदैव रेंगाळते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कवी ‘बीं’चं वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेलं ‘चाफा बोलेना’ हे गाणं. १९ जानेवारी हा वसंत प्रभूंचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज घेऊ या त्याच कवितेचा आस्वाद

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language